थेऊर (ता. हवेली) —
घर आणि गाडीचा हप्ता भरण्यासाठी माहेरहून ५५ हजार रुपये न आणल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सासरकडील चौघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना फेब्रुवारी २०२५ ते ४ जून २०२५ दरम्यान थेऊर गावात घडली. पीडित १९ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती सुशिल सिध्दराम बिल्लाळे, सासू मिना सिध्दराम बिल्लाळे, सासरा सिध्दराम गणपतराव बिल्लाळे आणि दीर स्वप्नील सिध्दराम बिल्लाळे (सर्व रा. गणेशवाडी, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि सुशिल बिल्लाळे यांचा प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, फेब्रुवारी २०२५ मध्ये सासरकडील मंडळींनी घर आणि दुचाकीच्या हप्त्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी विवाहितेने माहेरून पैसे आणून दिले. त्यानंतर मार्च महिन्यातही अशाच स्वरूपाची मागणी करण्यात आली.
दरम्यान, पैशांच्या मागणीत सातत्य वाढतच गेले आणि अखेर ५५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, विवाहितेने यावेळी पैसे देण्यास नकार दिला असता तिच्यावर शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी करण्यात आली. पती सुशिलने तिला मारहाण करत बेडरूममध्ये कोंडून ठेवले, तर दीर स्वप्नीलने धमकावले. सासू मिना यांनीही “लग्नात काहीच घेऊन आली नाहीस, आमचा मानपान केला नाहीस” अशा शब्दांत तिला अपमानित केले.
या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिच्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ८५, ११५(२), १२७(३), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत!
0 Comments